अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी उमेदवार जाहीर केला. मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता रायगडच्या मैदानात महायुती महाआघाडी आणि वंचित आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून (१२ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातू राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि वंचित बहुजनकडून कुमुदिनी चव्हाण यांच्यात लढत होईल. गीते आणि तटकरे यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचाराला सुरुवात व्हायची आहे.
कुमुदिनी चव्हाण या उच्चशिक्षित असून त्या महाडमधील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा असून मराठा महासंघाच्या रायगड अध्यक्ष आहेत. त्यांचे पती रवींद्र चव्हाण हे महाडमधील उद्योजक तसेच युवा अस्मिता फाऊंडेशनचे संचालक आहेत. शिवाय चव्हाण कोकण विकास प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्षदेखील आहेत. ‘वंचित’ने उमेदवार दिल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढणार असल्याची चर्चा आहे.