डोंबिवली : डोंबिवलीत रिंग रूट सारख्या विविध प्रकल्पातल्या भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित होता आहेत. त्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात यावा; अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती व शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच ज्यांच्या जमिनी या आधी हस्तांतरित करण्यात आल्या, त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ देण्याची मागणी देखील केली.
दुर्गाडी ते मोठा गाव रिंग रूट हा महापालिका क्षेत्रातील महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. हा रिंगरोड डोंबिवलीसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. डोंबिवली शहराचा कायापालट करणारा हा रिंगरोड असून रिंगरोडमधील ७० टक्के जमीन हस्तांतरित झाली आहे.
उर्वरीत ३० टक्के हस्तांतरित करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. मात्र रिंगरोडमध्ये बाधित शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. याबाबत माजी स्थायी समिती सभापती व शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.
जागेच्या बदल्यात दोन पट टीडीआर ऐवजी चार पट टीडीआर देण्यात यावा; अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत जमीन अधिग्रहण बाबत चर्चा झाली.
या बैठकीत प्रचलित नियमानुसार दिले जाणारे दोन पट टीडीआर तुटपुंजा दिसत असून चार पट टीडीआर दिला जावा. तसेच ज्यांच्या जमिनी आधी हस्तांतरित झाल्या. त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ घ्यावा. जेणेकरून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सोपी होईल. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे व अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सदर विषयात लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे कळवण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.