मुंबई, दि. १३ : : राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, राज्यात सध्या तमाशा सुरु असून महाराष्ट्राचा तमाशा करण्याचे हे पाप भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करत आहे. भाजपाने महाराष्ट्राला कलंक लावला असून शाहु, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठे नेऊन ठेवला आहे? असा प्रश्न पडला आहे. राज्यात सध्या जे सुरु आहे ते महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील सरकार अस्थिर असून हे सरकार कधी जाईल हे सांगता येत नाही. मलईदार खाती कोणाला मिळावीत यासाठी मारामारी सुरु आहे. कोणाला कोणते खाते मिळावे यात राज्यातील जनतेला स्वारस्य नाही. केंद्रातील भाजपा सरकार ईडी, सीबीआयची भिती दाखवून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यातील काही भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करुनही ती मिळालेली नाही. कृषी मंत्री बोगस पथक पाठवून लुटण्याचे काम करत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, महागाई, बेरोजगारी, जनतेच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्ष बोलत नाहीत, जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यात आलेले आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशानात सरकारला जाब विचारेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!