मुंबई : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क आणि अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील सात दिवसांच्या आत परत देण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने हा निर्णय घेतल्याचं पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे.

मुंबई नगरीची महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करत असते. येत्या सप्टेंबरमध्ये येणा-या श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान दिले आहेत

घरगुती गणेशोत्सवासाठी चार फूट उंचीची मूर्ती

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत. यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविधस्तरीय कार्यवाही करित आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून सन 2023 च्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी चार फूट पर्यंत उंची असणाऱ्या मुर्त्या या केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एका ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देतानाच यासाठी योग्य जागा शोधण्याचे आणि निर्धारित करण्याचे निर्देश परिमंडळीय सह आयुक्तांना आणि उपायुक्तांना आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले.

शाडूची माती मोफत मिळणार

त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणारी शाडूची माती काही प्रमाणात मोफत उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास बाहेरील राज्यातून देखील शाडूची माती आणून त्याचा मूर्तीकारांना पुरवठा करावा असेही निर्देश देण्यात आले.

या विशेष बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) . पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रभारी) (पश्चिम उपनगरे) रमेश पवार, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!