अवैध रेती उत्खाननाविरोधात डोंबिवली, ठाण्यात धडक कारवाई
रेती साठा करण्याचे ४३ हौद तोडले , ७८ ब्रास रेतीही जप्त
ठाणे : अवैध रेती उत्खाननाविरोधात डोंबिवली आणि ठाण्यात धडक कारवाई करण्यात आलीय. आज सकाळी ठाण्यात पारसिक गणेशघाट परिसरात ७० ब्रास रेतीसाठा जप्त केला. साठा करण्यासाठी असलेले ३७ हौद जेसीबीच्या सहय्य्याने तोडण्यात आले. तर डोंबिवली गणेशघाट येथे सिमेंटचे ६ हौद उध्वस्त केले असून, ८ ब्रास रेतीसाठा जप्त केलाय.
रेती उत्खन्न आणि वाहतूकीसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अवैध रेती उत्खाननाविरूध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले होते त्यानुसारच ही धडक कारवाई करण्यात आलीय. आज सकाळपासून उपजिल्हाधिकारी पुनर्वसन संगीता टकले, रेतीगट शाखेचे तहसीलदार मुकेश पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस यांच्या पथकांनी पारसिकनगर येथील गणेशघाट परिसरात धाड टाकून ७० ब्रास रेतीसाठा जप्त केला. व ३७ हौद जेसीबीच्या सहय्य्याने तोडले. तसेच डोंबिवली शिवाजीनगर कुंभारखानपाडा परिसरातील गणेशघाट भागात जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करून या भागातील सिमेंटचे ६ हौद जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले तर ८ ब्रास रेतीसाठा जप्त केलाय. कल्याण तहसील कार्यालय, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेचे पथक, व विष्णूनगर पोलीस यांच्या टीमने ही कारवाई तहसीलदार अमीत सानप यांनी दिलीय. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय.