केडीएमसी हद्दीत १५० मीटर परिसरात मार्किंग कधी करणार ?
मनसे नेते राजू पाटील यांनी विचारला आयुक्तांना जाब
डोंबिवली : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन परिसरातील 100 ते 150 मीटर परिसरातील फेरीवाल्यावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने आज मनसेचे नेते प्रमोद ( राजू) पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेतली. महापालिकेकडून अजूनही १५० मीटर परिसरात मार्किंग का केली जात नाही असा जाब पाटील यांनी आयुक्तांना विचारला. यावेळी आयुक्तांनी मंगळवारी प्रशासकीय अधिका-यां सोबत होणा- या बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
सर्वोच्च न्यायालयाने 2009 रोजी दिलेल्या निकालानुसार फेरीवाल्यांना प्रार्थना स्थळे, शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल यापासुन 100 मी परिसरात तसेच महापालिका मंडई व रेल्वे स्टेशन यापासून 150 मी तसेच फूट ओव्हर ब्रीज यावर व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. न्यायालयाचा हा निर्णय महापालिका राज्यसरकार, रेल्वे याना बंधनकारक आहे. मात्र महापालिकेकडून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत असल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडलय. त्यामुळेच फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी आयुक्त पी वेलारासू यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी कधी करणार ? असा सवाल त्यांनी आयुक्तांना विचारला. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजाणवी होत नसल्याने प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची कायदेशीर नोटीस वकिलामार्फत आयुक्तांना पाठवली होती.
….तर आंदोलन छेडावं लागेल
आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी महापालिका प्रशासनाकडून चतुर्थश्रेणी कर्मचा- यावर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र वरिष्ठ पदावरील अधिका-यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला. तुम्ही कारवाई करण्यात कुचराई का करत आहात असा सवालही सरचिटणीस प्रकाश भोईर यांनी आयुक्तांना केला. येत्या काही दिवसात अनधिकृत फेरीवाल्यांविरेाधात प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास मनसेला पुन्हा एकदा जनआंदोलन छेडाव लागेल असा इशारा डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी दिला. या प्रसंगी विरोधी पक्षनेते मंदार हळबे , गटनेते प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, जिल्हा सचिव प्रकाश माने, जिल्हा संघटक राहुल कामत, शहर सचिव अरुण जांभळे, माथाडी सेनेचे राजन शितोळेंसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.