डोंबिवली : कल्याणमधील मलंग रोड पिसवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणीला तिच्या पतीनेच संपवण्याचा प्रयत्न केला. किरकोळ कारणावरून निर्दयी पतीने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. तरुणीचा पती काहीच काम करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. याच रागातून पतीने तिला संपवण्याचा प्रयत्न केला. मानपाडा पोलिसांनी संशयित आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.
कल्याण पूर्व येथील मलंग रोड परिसरात एका सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर दोघे राहतात. आरोपी पती बेरोजगार आहे. दोघेही मूळचे जळगावचे रहिवासी आहेत. २२ ऑक्टोबरला दोघे पती-पत्नी गावी गेले होते. त्यावेळी मुलीच्या मानेवर व्रण दिसल्याने तिच्या मामाने यासंदर्भात विचारणा केली. तरुणीने हकिकत सांगितल्यानंतर मामाच्या पायाखालील जमीनच सरकली.तरुणीच्या म्हणण्यानुसार, १६ ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास ती घरात काम करत होती. घरात साफसफाई करायची असून लोखंडी स्टूल उचलून गॅलरीत ठेवा, असे तिने पतीला सांगितले. एवढ्यावरून पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तू नेहमी मला काम सांगते. काही न काही बोलत राहते. तुझा आवाज आज बंदच करून टाकतो, असे तो रागाने म्हणाला. त्याने तिला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला.तरुणीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हादरलेल्या मामाने तिला सोबत घेऊन थेट जळगाव येथील पोलीस ठाणे गाठले. ज्या हद्दीत ही घटना घडली, तेथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला. त्यानंतर ती आणि मामा मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. तिच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी गणेश भुवड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. संशयित आरोपी हा जळगावला पळून गेला आहे. त्याला अटक करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी पथक नेमले आहे. लवकरात लवकर त्याला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.