मुंबईतील एक हजार अंध फेरीवाल्यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न
रेल्वेस्थानक बंदीमुळे अंध फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ
मुंबई -एलफिस्टन रोड रेल्वेस्थानक दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानकांतील फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे .या बंदीचा फटका रेल्वेस्थानके तसेच उपनगरीय व मेल-एक्सप्रेस रेल्वेगाडयांत फिरता फेरीवाल्याचा धंदा करणा-या अंध फेरीवाल्यांना बसलाय. मुंबई व नजीकच्या परिसरात असे सुमारे एक हजार अंध फेरीवाले असून त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती अंधांसाठी कार्य करणा-या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडस (नॅब) च्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी दिली. विशेष म्हणजे यातील अनेक अंध फेरीवाले हे ग्रॅज्युएट व पोस्टग्रॅज्युएट देखील आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात असे तीन ते चार हजार अंध फेरीवाले आहेत.
मुंबईतील उपनगरीय तसेच मेलएक्स्प्रेस गाडयांमध्ये हे अंध फेरीवाले वर्षानुवर्षे फेरीवाल्यांचा धंदा करत आहेत.कीचेन,बॅग बांधायची साखळी,रबरी उशा आदी प्रवाशांच्या गरजेच्या सामानाची हे अंध फेरीवाले फिरून विक्री करत असतात.काही फेरीवाले रेल्वेस्थानकांतील फूटओव्हर ब्रिजवर फाईल्स तसेच छोटयामोठया स्टेशनरी आदी सामानांची विक्री करत असतात.अनेक अंध नवरा-बायको दोघेही फेरीवाल्यांचा धंदा करतात.अशी शेकडो कुटुंबे आहेत.मात्र फेरीवाल्यांवरील बंदीमुळे या अंध फेरीवाले व त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती पल्लवी कदम यांनी दिली. रेल्वेस्थानकांतील अंध फेरीवाल्यांवर आता बंदी आली आहे.कायदयानुसार जर त्यांना बंदी घालणार असाल तर दिव्यांगांबाबत असणा-या दुस-या कायदयाची देखील अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे. ‘द राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॲबिलिटीज ॲक्ट २०१६’ नुसार अंधांना बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद आहे. आता हे अंध फेरीवाले बेरोजगार झाले आहेत त्यांना या कायदयानुसार बेरोजगार भत्ता देण्याची मागणी नॅबचे ऑनररी सेक्रेटरी जनरल सत्यकुमार सिंग यांनी केली आहे. पुर्वी रेल्वेस्थानकांत अंधांना टेलिफोन बुथसाठी जागा मिळायची. मात्र आता मोबाईल क्रांतीमुळे टेलिफोन बुथ कालबाहय झाला आहे. त्याच धर्तीवर रेल्वेस्थानकांमध्ये या अंध फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी छोटीशी का होईना जागा मिळावी अशी मागणी नॅबने गेली पंधरा वर्षे लावून धरली आहे.आधी देखील या अंध फेरीवाल्यांना व्यवसायासाठी बीजभांडवल नॅबकडूनच पुरविण्यात येते.रेल्वेने अशी जागा दिल्यास तिथे व्यवसायासाठी लागणारे बीजभांडवल देण्याची नॅबची तयारी असल्याची माहिती पल्लवी कदम यांनी दिली.मात्र पंधरा वीस वर्षे मागणी करूनही रेल्वेमंत्रालयाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
दिव्यांगाचा तातडीने विचार करा- संजय निरुपम
मध्य रेल्वेवरील वांगणी येथे २६५ अंध कुटुंबे राहतात त्यातील नवरा बायको दोघेही अंध आहेत. यातील ९० टक्के हे फेरीवाल्यांचा व्यवसाय करतात.मालाड मालवणी येथे देखील अनेक अंध फेरीवाले राहतात.त्यांच्या जीवनमरणाचाच प्रश्न आता निर्माण झालाय .इतरत्र कोठेही नोकरी मिळत नाही.दिव्यांगांना सरकारी नोकरीत ४ टक्के आरक्षण आहे. मात्र ते पूर्णपणे कधीही भरले जात नाही. अंधांमध्येही ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, लॉ झालेले अनेकजण आहेत. मात्र उच्चविदयाविभूषित असूनही त्यांना नोकरी मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी हा फेरीवाल्यांचा व्यवसाय करावा लागतो आहे.यातील अनेक जण गेल्या २०-२५ वर्षांपासून हाच व्यवसाय करत आहेत.ते आता कुठे जाणार असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय.या आधी देखील या अंध फेरीवाल्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता.पोलिसांना हप्ते देणे,हप्ता न दिल्यास त्यांना अटक देखील करण्यात यायची.अंध फेरीवाल्यांना संबंधित यंत्रणेने विशेष ओळखपत्र देण्यात यावे .सरकारने या समस्येतून तातडीने मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अच्छे दिन चे स्वप्न दाखवणा-या भाजप सरकारने आम्हाला अच्छे दिन नकोत, पण होते ते जुने दिवस तर परत आणा म्हणण्याची वेळ अंध फेरीवाल्यांवर आली आहे. फेरीवाले हे काही श्रीमंत नाहीत रोज कमाओ आणि रोज खाओ वाले जीवन जगणारे अंध फेरीवाल्यांवर आज उपासमारीची वेळ फक्त आणि फक्त सरकारच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे आल्याची घणाघाती टीका निरुपम यांनी केलीय. सरकार मध्ये दिव्यांगाबाबत थोडी जरी आस्था शिल्लक असेल तर लवकरात लवकर आपले फेरीवाल्यासदर्भातील धोरण जाहीर करत यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली .