ठाणे : वांगणी रेल्वे स्थानकावर सफाई आणि हमाली चे काम करणाऱ्या अनंता सातवे या मृत व्यक्तीच्या पत्नीला वांगणी रेल्वे स्थानकावरील सर्व आजी माजी रेल्वे कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करून आर्थिक मदत करीत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
वांगणी रेल्वे स्थानकावर मागील पंधरा वर्षे अनंता सातवे हा सफाई व हमाली चे काम करीत होता. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व आत्महत्या केलेल्या प्रवाशांचे मृतदेह ,त्यांच्या शरीराचे तुकडे गोळा करून रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांना सातवे हा मोठे सहकार्य करीत असे. अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू अशा या सातवे याचे नोव्हेंबर महिन्यात निधन झाले होते. मात्र सातवे हा रेल्वेचा अधिकृत कर्मचारी नसल्यामुळे त्याच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही. रेल्वे प्रशासनाला अनेक वर्षे सहकार्य करणाऱ्या अनंता सातवे या गरीब व्यक्तिच्या कुटुंबाला काहीतरी मदत मिळालीच पाहिजे या भावनेने मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य व वांगणी रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी वांगणी स्टेशन अधीक्षक रॉय व आदर्श कर्मचारी मयूर शेळके यांना दिवंगत सातवे यांच्या पत्नीला सर्वांनी आर्थिक मदत करावी अशी विनंती केली होती. सातवे यांचे योगदान व शेलार यांच्या विनंतीवरून वांगणी रेल्वे स्थानकावरील सर्वच आजी व माजी कर्मचाऱ्यानी वर्गणी जमा केली. या द्वारे अनंता सातवे यांच्या पत्नीला पाच हजार पाचशे रुपयांची रोख मदत स्टेशन मास्तर रॉय यांच्या हस्ते देण्यात आली.
रेल्वे कर्मचारी यांनी खासगी हमालाच्या परिवारास मदत केल्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. त्यांना देण्यात आलेली रक्कम फार मोठी नसली तरी तसा कोणताही संबध नसताना एका खासगी व्यक्तीसाठी रेल्वे कर्मचारी यांनी वर्गणी जमा करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे. या मदतीबद्दल मनोहर शेलार यांनी वांगणी च्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. –मनोहर शहाजी शेलार. संस्थापक अध्यक्ष;वांगणी रेल्वे प्रवासी संस्था.(रजि.), उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ (रजि.), मा.सदस्य;(SRUCC) मध्य रेल्वे.