मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. परीक्षेचा निकाल दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.७३ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ८१ टक्के लागला आहे.
कोकण विभागाची बाजी
बारावीच्या निकालात राज्यात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.०१ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला आहे. यंदा परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी २७१ भरारी पथकं तैनात केली होती. यामुळे यंदा गैरप्रकाराला आळा बसल्याचं दिसलं आहे. या परीक्षेसाठी ९ विभागीय मंडळात १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता १२ लाख ९२ हजार ४६८ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ९१. २५ टक्के आहे.
कुठे पाहता येईल निकाल ?
Maharesult.nic.in
hscresult.mkcl.org
SMS द्वारे निकाल पहा
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.