कल्याण : शॉर्ट सर्किटमुळे गृहसंकुलातील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात असणाऱ्या गृहसंकुलात आज दुपारी हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील साई पॅरेडाईज गृहसंकुलात ए 2 इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून धुराचे लोट येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती कळवली आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र इमारतीत एवढा धूर झाला होता की तिसऱ्या मजल्यावरून पुढे जाणेही दुरापास्त झाले होते. परंतु अग्निशमन दलाच्या पथकाने तशाही परिस्थितीत जीवाची पर्वा न करता पुढे जात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ही आग संपूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अर्धा ते पाऊण तास लागला. फ्लॅटमधील स्वयंपाक घराचे आगीमध्ये पूर्ण नुकसान झाले असून हॉलमधील सामानालाही त्याची झळ बसली. तर अग्निशमन दलाच्या पथकाने प्रयत्न करीत उर्वरित दोन खोल्यांमध्ये आग पसरण्यापासून वाचवले.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील सर्व रहिवाशांना खाली उतरवून या इमारतीचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तसेच या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *