ऐतिहासीक हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या कामाचा महापौरांच्या हस्ते  शुभारंभ :
महापालिकेची कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करा : महापौर महाडेश्वर

मुंबई : ऐतिहासीक हँकाँक पूलाच्या पूर्नबांधणीच्या कामाचा शुभारंभ सोमवारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाला. मुंबई शहरात तसेच उपनगरात रस्ते, पूल, मलनि:सारण वाहिन्या तसेच महापालिकेच्या विविध प्रकल्पांची व उपक्रमाची कामे सुरु आहेत. प्रशासनाने ही कामे होत असताना कंत्राटदाराकडून विहीत मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण कशी होतील याची खबरदारी घेण्याचे निर्देश महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका प्रशासनास दिले.

महानगरपालिकेच्या पूल विभागातर्फे “हँकॉक पूल पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ” शिवदास चापसी मार्ग, निअर फजलानी एल-ए-एकॅडमी ग्लोबल स्कूल, नूरबाग सर्कल, डोंगरी, मुंबई येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी महापौर बोलत होते. महापौर पुढे म्हणाले की, मुंबई शहरात हँकॉक पूलाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा पूल नव्याने बांधण्यात यावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीने विविध प्राधिकरणाच्या अधिका-यांची भेट घेऊन या पूलाचे बांधकाम लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा केला. सभागृह नेता व स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांनी महापालिकेच्या विविध अधिका-यांशी संपर्क साधून हा पूल बांधण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. महापौर दालानतही याबाबत वेळोवेळी बैठका घेण्यात आल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले. हँकॉक पूलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी नागरीक जसे उत्सुक आहेत. तशी उत्सुकता आम्हांला असल्याचे महापौराने यावेळी सांगितले. हँकॉक पूलामुळे डोंगरी, माझंगाव येथील नागरीकांना मोठा फायदा होणार आहे.

स्थानिक खासदार अरविद सावंत म्हणाले की, महापालिका प्रशासनाने पूल बांधण्यासाठी न्यायालयीन लढाई यशस्वीपणे लढली आहे. स्थानिकांना ही लढाई लढताना विश्वासात घेऊन लढली आहे. याबाबत आपण या भागाचे खासदार म्हणून संसदेतही हँकॉक पूलासंदर्भात वेळोवेळी आवाज उठविला आहे. महापालिका प्रशासन हँकॉक पूलाचा शुभारंभ करीत असताना आपणाला अत्यंत आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हणाले. नागरीकांच्या सोयीसाठी पूलाच्या सोबत रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी स्कायवॉकचीही येथे गरज आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे खा.सावंत यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, खा. अरविंद सावंत, सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल, नगरसेविका किशोरी पेडणेकर, उपायुक्त सुहास करवंदे, सहाय्यक आयुक्त ई विभाग व बी विभाग सर्व श्री. साहेबराव गायकवाड, उदयकुमार शिरुरकर, शिवसेना विभाग प्रमुख श्री. पांडुरंग सपकाळ, प्रमुख अभियंता (पूल) शीतलाप्रसाद कोरी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *