डोंबिवलीच्या सुकन्या औटीची चमकदार कामगिरी : होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत पटकावले रौप्य पदक
ठाणे मराठी माध्यमात मुलींमध्ये एकमेव विद्यार्थीनी
डोंबिवली : होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिर शाळेची विद्यार्थीनी सुकन्या संतोष औटी हिने रौप्य पदक पटकावले आहे.या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी अवघे ४६८ विद्यार्थी हेे अंतिम फेरीत पोहचले होते.ठाणे विभाग मराठी माध्यमात मुलींमध्ये सुकन्या एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे.सुकन्याच्या यशाचे सर्वत्रच कौतूक होत आहे.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण जतन व संवर्धनाची अभिरुची निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिके, पर्यावरण जतन व संवर्धनावर आधारित कृतिसंशोधन प्रकल्प, मुलाखत अशा चार वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जाते. सहावीत शिकणाऱ्या सुकन्या हिने कृती संशोधन प्रकल्प सर्व काही जाते कुठे ? शालेय पोषण आहार हा उपविषय सादर केला होता. या चारही टप्प्यात तिने यश मिळवले. सुकन्याचे वडील संतोष औटी हे स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षक आहेत. या परिक्षेसाठी वडीलाबरोबर आई सुजाता तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे सुकन्या सांगते. प्रामाणिकपणा, शिस्त, संस्कार, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी हाच यशाचा मूलमंत्र असल्याचे ती सांगते. सुकन्याला आएएस, शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर होण्याची इच्छा ती बोलून दाखवते. आतापर्यंत सुकन्या हिने ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे विभागात १८ वी, डोंबिवली टॅलेंट हंट२०१७, इंग्लीश म्यारेथॉन १५-१६, ज्युनियर म्याथ्स ऑलिम्पिक महाराष्ट्र ज्ञानपीठ प्रथम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इंग्लीश प्री एलिमेंट्री प्रथम, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा इ.३री -व ४ थी मध्ये डोंबिवली केंद्रात मुलींमध्ये प्रथम आणि केंद्रात ४थी येण्याचा मान मिळलाय, पै फ्रेंड्स लायब्ररी लेखक-बाल वाचक महोत्सव-कथा लेखन २रा क्रमांक, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली तर्फे अमृतपुत्र गौरव प्रमाणपत्राने सन्मानित, तर राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा अ श्रेणी असे विविध परीक्षात तिने यश मिळवले आहे.