ऐतिहासीक चवदार तळयाची स्वच्छता मोहीम
महाड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा ज्या चवदार तळ्यावरून सुरु केला ते चवदार तळे तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी एक श्रद्धास्थान आहे. पुराचा फटका चवदार तळयाला बसला असून गाळ आणि चिखल साचला आहे. त्यामुळे ऐतिहासीक चवदार तळयाच्या स्वच्छतेसाठी ठाणे महापालिका धावून आली आहे. चवदार तळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी जे जे करता येईल ते करणार असल्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
२२ जुलै रोजी आलेल्या महापुरात चवदार तळे परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले होते. सद्य:स्थितीत चवदारतळ्यामध्ये गाळ आणि चिखल साचला असून तो गाळ आणि चिखल पूर्णपणे काढणे आवश्यक आहे. चवदार तळ्यातील चिखल व गाळ काढण्याच्या कामाची विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे २०० जणांचे विशेष पथक अत्यावश्यक मशिन्ससह दोन आठवडे शहरातील स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. त्या कामाची शिंदे यांनी आज पाहणी केली.
ऐतिहासिक चवदार तळ्यातील चिखल, गाळ काढणे, पाण्याची स्वच्छता तसेच औषध फवारणी करण्याचे काम आज महापालिकेच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहे. यासाठी विविध मशिन्ससह महापालिकेचे मनुष्यबळ कार्यरत आहे. यावेळी नगरविकास मंत्री शिंदे यांच्यासोबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते.
……