मुंबई, दि. ३० – रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत 17 हिरकणी कक्ष स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्या अंतर्गत पहिल्या हिरकणी कक्षाचा शुभारंभ मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक (वाहतूक) शिवाजी जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुपेकर, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्यात येतो. त्याअंतर्गत मुंबईतील विविध बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील. हे सर्व कक्ष वातानुकूलित केले जातील. या कक्षांमध्ये महिला आणि बालकांना विश्रांती घेता येईल. प्रत्येक जिल्ह्याला अशी सुविधा असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बस चालक तसेच वाहकांसाठी सुद्धा मागणीनुसार अद्ययावत विश्रांती कक्ष बनविण्यात येतील अथवा त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. कामा हॉस्पिटल येथे मुंबईत येणाऱ्या निराश्रीत महिलांसाठी कक्ष उभारण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
कामगारांसाठी देखील सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे सांगून कामगार केंद्र अत्याधुनिक करून तेथे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, जीम, नेमबाजी सुविधा, ॲस्ट्राटर्फ तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने येथील सोयी-सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.