मुंबई, दि. 21 : पर्यटकांनी वारसा स्थळांना भेट द्यावी आणि त्यांना त्या स्थळांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी वारसा स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. याचा राज्याला आणि देशाला निश्चितच लाभ होईल. यासाठी पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्व संस्थेच्या समन्वयाने योजना तयार करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद सर्कलमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे डॉ.मिलन चौले, डॉ. राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री ठाकरे म्हणाले, प्रत्येक शहराला ऐतिहासिक महत्त्व असते. त्याअनुषंगाने तेथील वारसा स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना होणे आवश्यक आहे. यासाठी ४ ते ५ वारसा स्थळांची निश्चिती करावी तसेच तेथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. ज्या बाबींसाठी परवानग्या आवश्यक आहेत त्या मिळविण्यासाठी एकत्रित पाठपुरावा करावा. राज्य शासनाने मान्यता दिलेल्या गाईड्सना वारसा स्थळांच्या आत प्रवेश मिळावा. गाईड्सचे दर निश्चित करावेत. सध्या दुरवस्थेत असलेल्या सुविधा अद्ययावत कराव्यात आदी बाबींवर चर्चा करून श्री.ठाकरे यांनी आवश्यकतेनुसार संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्याची सूचना केली.