मुंबई : मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) दादर, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे, याचा फटका वाहतुकीवर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे परळ भागात असलेल्या वाडिया आणि के.ई.एम.रुग्णालयाच्या परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचल्याने या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसला आहे. राजधानी मुंबईत काहीशी पाणीबाणी झाल्याचं चित्र आहे. तर, समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकानी केलं आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, हवामान खात्याचा अंदाज आणि पर्जन्यस्थिती पाहता मुंबई पोलिसांनीही ट्विटरवरुन महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडा. कृपया काळजी घ्या आणि गरज पडल्यास 100 नंबरवर संपर्क करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.  

दरम्यान, मुंबईत गेल्या ३ दिवसांत ३२६  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, २० जुलै रोजी कोलाबा येथे १११ मिमी तर सांताक्रुझ येथे ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर च्या भटवाडी कातोडी पाडा येथे दरड कोसळली, सुदैवाने कोणी जखमी नाही, काही घरांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईतील वाडिया आणि के.ई.एम. रुग्णालयात जे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येत आहेत, त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील याचा फटका बसत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, पश्चिम परिसरात दादाभाई रोड आणि S.V रोड पाण्याखाली गेला आहे. विलेपार्ले पूर्व आणि पश्चिमला जोडणारा कॅप्टन गोरे उड्डाणपूल खालील पश्चिम परिसरात दादाभाई रोड रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असून पाणी पातळीत अजून वाढ झाली तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *