मुंबई- ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी
मुंबई : ऑक्टोबर हिटचा चटका सहन करावा लागत असतानाच शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करीत संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईच्या उपनगरासह नवी मुंबई कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्हयात पावसाने हजेरी लावली. मुंबई व नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला. अचानक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. येत्या २४ तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मुंबई व काेकणात ५ ते १४ आॅक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.