कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. कल्याणकरांना याचा सर्वाधिक फटका बसला. येथील अनेक सखल भागात, रस्त्यांवर पाणी साचले. तर काही भागात चाळींमध्ये पाणी जाऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नालेसफाई योग्य न झाल्याने पहिल्याच मुसळधार पावसात पाणी साचल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
कल्याण डोंबिवली तसेच ग्रामीण भागात गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरु होता. रिमझिम पावसाच्या सरी अधून मधून शहरात येत असल्याने नेहमीच्या गतीने जनजीवन सुरळीत सुरु होते. मात्र सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला.अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मध्य रेल्वे मार्गाला पावसाचा फटका बसल्याने लोकल उशीराने धावत होत्या. कामावर जाण्याच्या वेळेला जोराचा पाऊस आल्याने पायी जाण्याऐवजी चाकरमान्यांनी रिक्षाने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे रिक्षा थांब्यावर प्रवाशांना रिक्षाची वाट पाहत थांबावे लागत होते. स्टेशन परिसरात वाहनांची कोंडी होत होती.
सकाळपासून पडलेल्या पावसाने कल्याणमध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्याचे सकाळी दिसून आले. पश्चिमेतील रेतीबंदर भागात, शिवाजी चौकात, स्टेशन परिसर,आधारवाडी चौक परिसर, दुर्गाडी भागात पाणी साचले होते. कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिर परिसर, पिसवली गावात पाणी साचल्याचे दिसून आले.पिसवली येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना पोरा बाळांसह घराबाहेर पडावे लागले. काही नागरिक घरात शिरनारे पावसाचे पाणी उपसून बाहेर टाकत होते. या पाण्यामुळे घरातील अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे.