नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना वारंवार पत्राद्वारे विनंती करूनही वेळकाढूपणा केला जात असल्याचा मुद्दा शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टासमोर मांडला आहे. या दोन्ही याचिकावर आज एकाच वेळी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, यासाठी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सूचना द्यावात, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील दबाव वाढला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी विधानभवनात अध्यक्षांसमोरच ठाकरे-शिंदे गटात जोरदार खडाजंगी झाली. शिंदे ठाकरे गटाकडून एकमेकांविरोधात ५४ याचिका अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत आणि सर्व याचिकांवर वेगवेगळी सुनावणी होत असल्यामुळे विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला असून, एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली.
त्यावर शिंदे गटानं जोरदार आक्षेप घेतला आहे. वेगवेगळ्या घटना,मुद्दे असल्याने एकत्र सुनावणी घेणं योग्य नाही असं शिंदे गटाचं म्हणणे आहे. सर्व याचिकांवर वेगळी सुनावणी घेतल्यामुळे वेळ लागेल असा दावा ठाकरे गटाने केला. दरम्यान, याचिकांवर एकत्रित की स्वतंत्र सुनावणी बाबत विधानसभा अध्यक्ष २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहेत.