मुंबई – राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. त्याच्या प्रतिंबधासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून आरोग्य यंत्रणा सतर्क केल्याचे निवेदन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंत्री सावंत यांनी केले.
राज्यात कोविड 19, एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवेदन करावे, अशा सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील रुग्ण संख्या आणि उपाययोजनांबाबतची माहिती परिषदेत दिली. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणे यात दिसून येत आहेत. राज्य शासनाने त्यामुळे सर्वेक्षण, चाचण्या वाढवावी अशा सूचना दिल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात नागपूर अधिवेशन काळात कोविड रुग्ण वाढले होते. त्यावेळी 2016 ठिकाणी मॉकड्रील केले होते. आरोग्य व्यवस्था आणि रुग्ण खाटांची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, ऑक्सिजन प्लांट किती चालू आहेत, याबाबत आढावा घेतला होता. आता ही वाढत्या रुग्णावाढीमुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान, जनजागृतीचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोग्य यंत्रणा पुर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात 4 हजार पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वृध्द, अति झोपेच्या व्यक्ती आरोग्य कर्मचारी यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लस घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी वितरीत केला आहे. लसीकरणाचा साठा उपलब्ध आहे का, याचा आढावा घेतला असून नागरिकांनी काय करावे, याबाबत शहर आणि गावात लावण्याचे मार्गदर्शन फलक लावण्याचे आदेश दिल्याचे मंत्री सावंत यांनी परिषदेत दिले.
राज्यात एच1एन1 बाधितांची संख्या आज 405 इतकी आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एच3एन2 बाधित संख्या 195 असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संशयीत 3 रुग्ण आढळून आले असून कोविड बाधितांची संख्या 1308 इतकी असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच कोविड रुग्ण वाढीचा दर 3 टक्के इतका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन सक्रीय रुग्णवाढ सुरु आहे. दैनंदिन सरासरी चाचण्या 6 हजार 78 होत आहेत. एक्सबीबी 1.16 चे 62 रुग्ण आहेत. पुण्यात 50, ठाण्यात 8, मुंबईत 1, कोल्हापूरमध्ये 1, अहमदनगरमध्ये 1, अमरावतीत 1 आढळले आहेत. सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस – 9 कोटी 16 लाख 67 हजार 928
दुसरा डोस – 7 कोटी 66 लाख 23 हजार 350
बुस्टर डोस – 96 लाख 93 हजार 851