मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून येत्या रविवारी, 31 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर पार पडणार आहे. चोख व्यवस्थापनासह पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याची माहिती या परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ने दिली आहे.
तब्बल 3462 पदे भरली जाणार
कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची ही भरती परीक्षा राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट ड’ संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय 78 कार्यालयांमधील तब्बल 3462 रिक्त पदे या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी 31 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून या परीक्षेच्या प्रवेशपत्र वितरणाची ऑनलाइन प्रक्रिया मंगळवार, 26 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
साडेतीन लाखांहून अधिक परीक्षार्थी होणार सहभागी
‘गट ड’ संवर्गातील पदांच्या भरती परीक्षेसाठी तब्बल 4,61,497 उमेदवारांनी अर्जनोंदणी केली असून त्यांपैकी सुमारे 3 लाख 60 हजार उमेदवारांनी आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे. या परीक्षेद्वारे भरली जाणारी काही पदे जिल्हास्तरीय असल्याने काही उमेदवारांनी एकाहून अधिक जिल्ह्यांतील पदांसाठी स्वतंत्र अर्जनोंदणी केली होती. अशा उमेदवारांना त्यांच्या प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र प्रवेशपत्र देण्यात येत आहे. त्यापैकी कोणत्या जिल्ह्यातील पदासाठी परीक्षा द्यायची याचा निर्णय परीक्षार्थींनी स्वत:हून करायचा आहे. असे परीक्षार्थी ज्या जिल्ह्यातून संबंधित प्रवेशपत्राद्वारे परीक्षा देतील, त्यांचे मूल्यांकन त्याच संबंधित जिल्हास्तरीय पदांसाठी केले जाईल, असेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे. परीक्षार्थींना त्यांच्या नोंदणीकृत वैयक्तिक ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतचे तपशील पाठविण्यात आल्याचेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने सांगितले आहे. तरीही परीक्षार्थींना प्रवेशपत्राबाबत काही शंका अथवा समस्या असल्यास 9513315535, 7292013550 या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ‘न्यासा कम्युनिकेशन’ने केले आहे.
परीक्षेसाठी 1364 परीक्षा केंद्रे, बैठक व्यवस्थेसाठी निकष
राज्यभरातील तब्बल 1364 केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून एकाच सत्रात सर्व पदांसाठी ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी पार पडेल. परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्थेचे निकष पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले आहेत