कल्याण ‘आयएमए’नेही दिला पाठिंबा
कल्याण दि.12 डिसेंबर : संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर निरोगी शरीर आणि आरोग्याचे महत्व पटवून देण्यासह जनजागृती करण्यासाठी कल्याणातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘कल्याण ते हैद्राबाद’ असा तब्बल 730 किलोमीटरचा टप्पा सायकलद्वारे गाठण्यात येणार आहे. यामध्ये नामांकित डॉक्टर, वकील, प्रोफेसर, उद्योजकांसह 9 जणांचा समावेश आहे. या सामाजिक उपक्रमाला ‘इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण’नेही आपला पाठिंबा दर्शवला आहे.
मार्च महिन्यामध्ये भारतासह संपूर्ण जगात शिरकाव केलेल्या कोरोनाने सर्वांचेच आयुष्य बदलून टाकले आहे. कोरोनाची लस अद्यापही अंतिम टप्प्यामध्ये असली तरी चांगले आरोग्य आणि योग्य जीवनशैली असल्यास कोरोनावर निश्चितच मात करता येते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नेमका हाच धागा पकडत कल्याणातील विविध जागरूक नागरिक एकत्र आले आणि निरोगी आरोग्याबाबत जनजागृतीसाठी त्यांनी कल्याण ते हैद्राबाद सायकलप्रवास करण्याचा निर्णय घेतला.
सायकलपटू डॉ. रेहनुमा, बाईकपोर्ट सायकलचे साहिर शेख, बालरोगतज्ज्ञ डॉ. अनंत इटकर, ऍड. चंद्रभान साबळे, प्रोफेसर आनंद जाधव, रेल्वेचे अधिकारी गिरीश राव, भारतीय नौसेनेतील रमेश पलाटी, सुधाकर वर्मा आणि हॉटेल व्यावसायिक किरण शेट्टी हे या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले आहेत. सायकलिंग हा आजच्या घडीला शारिरीक आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय असून त्याचे महत्व पटवण्यासाठी आणि कोवीड योद्ध्यांच्या सन्मानासाठी आम्ही हा उपक्रम राबविल्याची माहिती डॉ. रेहनुमा यांनी दिली.
पुढील 5 दिवसांत म्हणजेच 16 डिसेंबरपर्यंत ते कल्याण हैद्राबाद असा प्रवास करत हे सायकलपटू आरोग्याबाबत जनजागृती करणार आहेत. दरम्यान या सामाजिक उपक्रमाला इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणनेही पाठिंबा दर्शवत या जागरूक नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्याबाबत लोकांमध्ये अधिकाधिक जागरूकता येणे ही काळाची गरज असून त्यासाठी या लोकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
*****