कल्याणात फेरिवाल्याची दादागिरी, नोकरदार महिलेला मारहाण
कोळसेवाडी पोलीसांकडून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
कल्याण : कल्याण डेांबिवली शहरात अमराठी फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असतानाच, कल्याण पूर्वेत एका अमराठी फेरीवाल्याने कामावरून घरी परतणा-या महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलाय. या फेरीवाल्याने रस्ता अडवून गाडी उभी केल्याने, त्या महिलेने गाडी बाजूला घेऊन रस्ता देण्याची मागणी केल्यानंतर त्या महिलेला मारहाण करण्यात आलीय. मात्र भयभित झालेल्या महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात ही महिला राहते. रात्री साडेआठच्या सुमारास ही महिला कामावरून घरी जात असतानाच तिच्या घराच्या रस्त्यावरच एका फेरीवाल्याने हातगाडी उभी करून रस्ता अडवून ठेवला होता. त्या महिलेने त्याला रस्त्यातून गाडी बाजूला घेण्याची मागणी केली. मात्र त्या मुजोर फेरीवाल्याने त्या महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत, तुम्हारे बाप का रस्ता है का, असे उर्मटपणे सवाल करीत, हाताने ढकलून त्या महिलेला खाली पाडले. त्यानंतर हाताने व चापटीने या महिलेला मारहाण केली. या मारहाणीमुळे भयभित झालेल्या त्या महिलेने आपल्या मुलासह केाळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्या महिलेला घरी जाण्यास सांगितले. या प्रकारामुळे कोळसेवाडी परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून फेरीवाल्यांना अभय ?
काही दिवसांपुर्वी या भागातील स्थानिक जाधव कुटुंबियांनी फेरीवाली महिलेला रस्त्यावरून हटण्यास सांगितले असता, या महिला फेरीवालीने या कुटुंबियाविरोधात विनयभंग, हप्तेखोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र मंगळवारी एका फेरीवाल्याने महिलेला मारहाण केल्यानंतरही त्या महिलेला घरी जाण्यास सांगितल्याने कोळसेवाडी पोलिसांच्या कामगिरीवर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. फेरीवाल्यांकडून पोलिसांना हप्ते पोहचत असल्यानेच त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात होता. त्यामुळे बुधवारी परिसरातील नागरिक ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.