गंगेची सफाई करणा-या भाजप सरकारच्या काळात बँकांची सफाई :  हार्दीक पटेल यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार होऊ देणार नाही असे ओरडून सांगत होते, पण विजय मल्ल्या आणि नीरव मोदी देशाचे पैसे खाऊन देशाबाहेर पळून गेले. त्यांना देशात कधी आणणार यावर मोदी एक शब्दही बोलत नाहीत. गंगेची सफाई करणा-या भाजप सरकारच्या काळात बँकांची सफाई होतेय. ही सरकारची मोठी नामुष्की आहे अशी टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आज मुंबईत केली. मुंबई काँग्रेस च्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधण्यासाठी ते मुंबईत आले होते.

देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. देशात आतंकवाद वाढला आहे. आपला देश वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन लढले पाहिजे. देशातील तरुणांनी यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला पाहिजे. हा तरुणांचा देश आहे. अनेक तरुणांनी देश वाचवण्यासाठी समाजकारणात व राजकारणात आले पाहिजे असे आवाहनही पटेल यांनी केले. भाजप सरकार तरुणांना पकोडे विकायला शिकवत आहे. मात्र रोजगार द्यायचा विचार करत नाही. शेतकऱ्यांच्या व दलितांच्या मूलभूत गरजा व प्रश्नांचा विचार करत नाही. म्हणूनच या सरकार विरोधात लोकांना जागरूक केले पाहिजे असेही ते म्हणाले. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पैशाच्या जोरावर दोन्ही  निवडणुका एकत्र घेण्याचा डाव
मी शंभर टक्के भाजप विरोधी आहे. मी काँग्रेसी नाही, परंतु काँग्रेसला मदत व पाठिंबा देणार आहे. यासाठी मी वारंवार मुंबईत येत राहणार आहे. हे सरकार मला त्रासही देईल. अनेक अडचणी निर्माण करेल. परंतु मी न डगमगता हे काम सुरूच ठेवणार आहे. भाजप सरकार छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे फक्त राजकारण करत आहे. केवळ घोषणा करायच्या, पुतळ्यांचे काम मात्र सुरू होत नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार उलथवून टाकण्याची वेळ आलीय. भाजप सरकार पैशाच्या जोरावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा डाव रचत आहे. आपण सर्वांनी मात्र निष्ठा, मेहनत व सोशल मीडिया यांच्या जोरावर लोकांना जिंकायचे आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे असेही पटेल म्हणाले.

सोशल मिडीयाच्या जोरावर भाजप सरकार उलथवू शकतो
भाजप सरकार पैश्याच्या जोरावर निवडणुका जिंकत आले आहे. हे सरकार वर्षाला 200 ते 300 कोटी रुपये फक्त सोशल मीडियावर खर्च करते. याच सोशल मीडियाच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. हीच सोशल मीडिया एखाद्याला पंतप्रधान बनवू शकते, तर याच सोशल मीडियाच्या जोरावर भाजप सरकारला येत्या निवडणुकीत पाडू शकते, असेही पटेल म्हणाले. सोशल मीडिया हे खूपच अचूक आणि प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियामुळे एखादा संदेश १५ सेकंदांमध्ये २५ लाख लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक यांचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. सोशल मीडियावर एखादी चळवळ किंवा आंदोलन आपण उभे करू शकतो. व्हाट्सएप पेक्षा आता ट्विटर आता जास्त शक्तिशाली व प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियाच्या जोरावर आपण लोकांमध्ये जागृती व उठाव करून भाजप सरकारला उलथवून टाकू शकतो असाही विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *