देशातील पहिल्या इंडस्ट्रीयल पार्कचे मुख्यमंत्रयाच्या हस्ते उद्घाटन
2 हजार रोजगार निर्मिती आणि 10 हजार जणांना रोजगार मिळणार
पुणे : पुण्यात साकारण्यात आलेला देशातील पहिल्या इंडस्ट्रीयल पार्कचे शानदार उद्घाटन मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. इंडस्ट्रीयल पार्कच्या माध्यमातून थेट २ हजार नवीन रोजगाराची निर्मिती होणार असून, अप्रत्यक्ष दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिकच घट्ट होतील असा विश्वास मुख्यमंत्रयानी यावेळी व्यक्त केला. पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीतील हायर इंडस्ट्रीअल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्रयाच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात महाराष्ट्राला उद्योजकांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती होणार आहे तसेच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. 2015 साली चीन दौऱ्यावेळी हायर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायर इंडिया प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी हायर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष लियांग हॅशन, हायर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक साँग युजुन, हायर इंडियाचे अध्यक्ष इरीक ब्रगॅन्झा, आमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित होते.
गुंतवणूकदारांची पुण्याला पसंती
राज्यात इंग्लंड,जपान, अमेरीका, जर्मनी, नेदरलॅण्ड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणूक आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर असून प्रतिमाणसी उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. पुणे हे देशाचे स्टार्ट अप हब आहे. गुंतवणूकदारांची पुण्याला सर्वाधिक पसंती आहे. पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्याच बरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने फूड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसीत होत आहे. भाजी पाला व फळांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग या निमित्ताने येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअर, हार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजाराहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या या परिसरात येत आहेत. या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल.
काय आहेत पार्कची वैशिष्टे
रांजणगाव मधील हा प्रकल्प ४० एकर क्षेत्रावर आहे. पार्कच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलीय. मेक इन इंडियाच्या धर्तीवरील मेक इन महाराष्ट्र अभियानातील गुंतवणूक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हायर इंडिया कंपनीच्या उत्पादन क्षमतेत दुपटीने वाढ होऊन रेफ्रिजरेटरचे उत्पादन १.८ मिलियन होणार आहे. त्याचबरोबर एलइडी टेलिव्हिजन, वाशिंग मशीन, वाटर हिटर आणि एअर कंडीशनरचे उत्पादनही होणार.