मुंबई दि.26 : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने सोमवारी पुण्यासह नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी, रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. २४ ते २८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत कोकण विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने २८ सप्टेंबर रोजी किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे . नागरिकांनी अधिक काळजी घेतानाच नदीकाठच्या तसेच किनारपट्टीवरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. याकाळात मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं काल दुपारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. यानंतर आता हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. आज (26 सप्टेंबर) मध्य रात्रीपर्यंत हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्नम दरम्यान धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.