गुजरातच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
नरेंद्र मोदी – राहुल गांधीची प्रतिष्ठा
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाला गुरूवारी सकाळपासून सुरूवात झाली. यात अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांचा समावेश आहे. ९३ जागांसाठी ८५१ मतदार रिंगणात आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ९ डिसेंबरला पार पडले. 9 जिल्ह्यातील 89 जागांसाठी हे मतदान झाला. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे. २०१२ च्या निवडणुकीत ९३ पैकी ५२ जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर काँग्रेसला ३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. या टप्प्यातील निवडणुकीत ओबीसी नेता अल्पेश ठाकूर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि काँग्रेसचे जिवाभाई पटेल यांच्यात मेहसाणात अटीतटीची लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलीय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता. तसेच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केले.