सूरत, 28 ऑक्टोबर : गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, शनिवारी उघडकीस आली. सूरत येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. यामध्ये ६ जणांनी विष प्राशन केले, तर एकाने गळफास लावून घेतला. एकाच वेळी अनेक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार सूरत येथील पालनपूर पाटियाजवळील नूतन रो-हाऊससमोरील सिद्धेश्वर सोसायटीत ही घटना घडली असून, या 7 सदस्यांनी सामूहिक आत्महत्या करत आपले जीवन संपवले. मृतांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदनाची तयारी सुरू केली. अद्याप घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचे पथक कसोशीने प्रयत्न करत आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणारे मनीष सोलंकी हे बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. हे कुटुंब मोठ्या फर्निचरच्या व्यवसायात गुंतले होते. फर्निचर बनवणे हे कुटुंबाचे काम आहे. मनीष भाईला लोकांकडून पैसे परत घ्यायचे असल्याची चर्चाही स्थानिक लोकांमध्ये आहे. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून आर्थिक संकटामुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.