…तर मोदींचा अश्वमेध रोखला जाऊ शकतो

गुजरात निवडणूक/ संतोष गायकवाड

सा-या देशाचे लक्ष गुजरात निवडणूकीकडे लागून राहिलय. गुजरात निवडणूक ही तशी सगळया दृष्टीने महत्वाचीच मानली जातेय. अनेक पैलू या निवडणुकीशी जोडले गेलेत. एक कारण  म्हणजे  पंतप्रधान मोदींना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, पाटीदार नेता हार्दीक पटेल आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी दिलंल आव्हान. दुसर म्हणजे या निवडणुकीकडे २०१९ च्या लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल जातय. तर तिसर कारण, काँगेसला उभारी येण्यासाठी हि निवडणूक तितकीच महत्वाची ठरणार आहे. आणि सर्वात महत्वाचे चौथं कारण म्हणजे,  मोदी लाट आहे की नाही याचाही निकाल या निवडणुकीच्या निमित्ताने   लागणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक अतिमहत्वाची ठरलीय. निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये जाण्याचा योग आला. तिथलं पाटीदार समाजाचे आंदोलनाने झालेली एकजूट, दलित ओबीसी समाजातील अस्वस्थता, नोटाबंदी, जीएसटी यावरून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी यांच्या मनात प्रचंड प्रमाणात असलेली खदखद जाणवली. काहींनी दबक्या स्वरातच उघड केली तर काही उघडपणे बोलत नव्हते. पण ही असंतोषाची खदखद मतपेटीच्या रूपाने बाहेर पडली, तर  मोदींना गुजरातमध्ये नक्कीच हादरा बसू शकतो. 

देशभरात मोदींचे वारे वाहत आहेत. गुजरातमध्ये भाजपची २२ वर्षे सत्ता आहे. तर मोदी १५ वर्षे मुख्यमंत्री होते. गुजरातमधूनच मोदींचा अश्वमेध देशभरात दौडू लागलाय. त्यामुळेच खरं तर ही निवडणूक भाजपपेक्षा मोदींच्या प्रतिष्ठेची बनलीय अस म्हटल्यास अतिश्योक्तीचे ठरणार नाही. तर दुसरीकडे मोदीच्या अश्वमेधाला लगाम घालण्यासाठी गुजरात निवडणुकीची संधी हेरून विरोधक त्याच ताकदीने रणांगणात उतरलेत. निवडणुकीमुळे इथले राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालय. भाजप आणि काँग्रेसमध्येच खरा सामना रंगणार आहे. काँग्रेसनेही हार्दीक पटेल यांच्याशी मोट बांधलीय. त्यामुळे  विरोधकांची ताकद अधिकच वाढलेली दिसतेय. २००२, २००७ आणि २०१२ या तिन्ही निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र मागील पाच वर्षानंतर राजकीय वातावरण बदलून गेल्याचे दिसून येतय. पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी पाटीदार समाजाचे मोठ आंदोलन उभं केलयं. नोटाबंदी जीएसटीवरून काँग्रेसच्या राहुल गांधींनी भाजपला घेरलयं. तर दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनीही मोठ आव्हान उभं केलयं. या सगळयांच्या सभा आणि रॅलींना लोकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सीडी प्रकरणानंतरही हार्दीक यांना मिळणारा प्रतिसाद कमी झालेला नाही. समाज मोठया प्रमाणात त्यांच्या पाठीशी एकवटलाय. अस सगळं चित्र गुजरातमध्ये पाहावयास मिळालं. गुजरातमध्ये पाटीदार समाज हा २५ लाखापर्यंत आहे. सध्या सर्वपक्षीय ४४ आमदार हे पाटीदार समाजाचे आहेत. तर १० ते १२ मंत्री सुध्दा आहेत. पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपने ६० ते ६५ पाटीदार समाजाचे उमेदवार उभे केले आहेत. मात्र तरीसुध्दा हार्दीक पटेल यांच्या सभांना प्रचंड गर्दी होतेय. भूज जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत पाटीदार समुदायाचे संख्यात्मकदृष्ट्या वर्चस्व आहे. सौराष्ट्रमध्येही पाटीदार समाजाचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत पाटीदार समाज कोणाच्या पाठीशी उभा राहतो यावरही अनेक गणित  ठरणार आहेत.

गुजरात विधानसभेसाठी २०१२ मध्ये १८२ जागांसाठी निवडणूक झाली. त्यावेळी भाजपने ११५ , काँग्रेस ६१ आणि अन्य ६ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागा जिंकल्या होत्या. पण पाच वर्षानंतर राजकीय परिस्थितीत खूपच बदल झालाय. त्यातच मोदींचा नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे नाराजीची भावना दिसून येतेय. नोटाबंदीच्या निर्णयाची सुरत इथल्या कपडा व्यापा-यांनी मोठया प्रमाणात नाराजी प्रकट केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लाखो तरूण बेरोजगार झालेत. त्यामुळे व्यापा- यांच्या नाराजीचा फटका भाजपला पडू शकतो. द्वारका परिसरात काही चहा विक्रेत्यांशी गप्पा मारताना त्यांनी  मोदींच्या यशाचे कौतूक केले असले तरी त्यांच्या मनातील नोटाबंदी आणि शेतक-यांविषयीची नाराजी लपून राहिली नाही. ती प्रकर्षाने बाहेर पडली. त्यामुळे या निवडणुकीत नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका भाजपला पडणार हे निश्चितच आहे आणि हेच मुद्दे घेऊन विरोधकांनी भाजपला घेरलयं असेच चित्र दिसून येतय. या निवडणुकीत शिवसेनाही मैदानात उतरली असून, ४८ जागांवर उमेदवार उभे केलेत मात्र शिवसेनेचा नामोनिशान नाहीय. त्यामुळे शिवसेना तशी जमेत नाहीय. गुजरातमध्ये ऐतिहासीक मंदिर मोठया प्रमाणात आहेत पर्यटकांवर स्थानिकांचा रोजगार आहे त्यामुळे धार्मिक प्रचाराकडे भाजपने अधिक ओढा दिसून आलाय. मोदींनी आपल्या प्रचारांचा शुभारंभही आशापुरा मंदिरातील दर्शनातूनच केला. दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. ८९ विधानसभा मतदारसंघात ९ डिसेंबर आणि ९३ मतदारसंघात १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १८ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात विभागातील ८९ जागांसाठी मतदान होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे मुख्यमंत्रीपदाचा इतका ठसा उमटू शकलेले नाहीत. त्यामुळे गुजरातच्या रणांगणात पून्हा मोदींना आपली टीम घेऊन उतरावे लागले आहे. हेच भाजपचे पहिले अपयश म्हणावं लागेल. त्यामुळे मोदी लाट आहे की नाही हे पाहण्यासाठी १८ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
——-

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *