पावसाळ्यापूर्वी मेट्रो मार्गावरील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश
ठाणे, दि. 31 – ठाणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गाच्या कामांची तसेच या मार्गावरील रस्त्यांच्या कामांची आज पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी मेट्रोच्या मार्गाखालील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी . शिंदे यांनी दिले.
ठाणे शहरातील मॉडेला नाका ते कासारवडवली या मार्गावरील कामांची शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह एमएमआरडीए, मुंबई मेट्रो महामंडळ, एमआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच रस्ते व रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो उपयुक्त आहे. यामुळे या प्रदेशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मेट्रो 4 या मार्गामुळे वडाळा ते थेट भिवंडीपर्यंतचा भाग जलद वाहतुकीने जोडला जाणार आहे. ठाण्यामधील मेट्रोचे काम अधिक गतिमान व्हावे, यासाठी संबंधितांना सूचना केल्या आहेत. मुलुंडपासून ते कासारवडवली पर्यंतच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या कामांचा आढावा घेऊन मेट्रो पिरलच्या ठिकाणी आवश्यक तेथेच बॅरेकेटींग ठेवून इतर ठिकाणचे बॅरेकेटिंग काढून टाकण्यात येतील. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर कुठेही डेब्रिज, खड्डे राहू नयेत, यासाठी सूचना दिल्या आहेत.मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्ग हा ठाणे शहरातून जात आहे. या मेट्रो मार्गाचे काम गतीने सुरू आहे. ठाणे शहरातील मॉडेला नाका ते कासारवडवली या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांची प्रगती तसेच या मेट्रोमार्गाखालील रस्त्यांच्या सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच मेट्रोच्या पिलरखालील दुभाजकाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत. या ठिकाणी पावसामुळे पाणी साचून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.