ठाणे : शहरात रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत असून दररोजच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीचा फटका मंत्री छगन भुजबळ यांनाही सहन करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट रस्त्यावर उतरून खड्डयांची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी अधिका-यांना चांगलेच फटकारले. रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदाराना ब्लॅकलिस्ट करा असे शिंदे यांनी ठणकावले.

सततचा पाऊस आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गेले चार-पाच दिवस ठाणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महापालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एनएचएआय आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह आनंदनगर चेकनाका ते गायमुख तसेच पडघ्यापर्यंतच्या रस्त्यांची आणि खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाचीही पाहणी केली.

रस्त्यांची चाळण झालेली पाहून शिंदे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जे काम केले आहे ते चांगले काम करा. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची कामे करण्यास सांगितले होते ती कामे पूर्ण करा. रस्त्यावरील खड्ड्यांच्या रोज बातम्या येत आहेत. लोक वैतागत आहेत. त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत असा संताप शिंदे यांनी व्यक्त करीत अधिका-यांना फैलावर घेतले. त्यामुळे पालकमंत्रयाच्या संतापानंतर तरी ठाणे खड्डे मुक्त होईल का ? असाच प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

ठाण्यात मनसेने भरवले ५०० खड्यांचे प्रदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *