मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी आज बुधवारी (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावत बाबासाहेबांना आदरांजली वाहली.
चैत्यभूमीवर जमलेल्या अनुयायांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार, आणि त्यांचे स्मारक उभारणं हे सरकारसाठी सर्वोच्च बाब आहे. त्यामुळे इंदूमील येथील स्मारक उभारणीला वेग आला आहे. हे भव्य स्मारक आणि तेथील ग्रंथालय आणि संदर्भ बाबासाहेब यांच्याविषयीची माहिती साहित्य संदर्भ जगभरातील अनुयायी बाबासाहेबांविषयी त्यांचा अभ्यास संशोधक अभ्यासकांना प्रेरणादायी ठरतील आणि ते प्रोत्साहित करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर जगाला हेवा वाटावं अशा प्रकारचं बाबासाहेबांचं हे स्मारक उभं राहील असं आश्वासनसुद्धा यांनी यावेळी दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज देशांच्या कानाकोपऱ्यातील लाखो अनुयायी महामानव डॉ. बाबासाहेबांच्या चरणी माथा टेकवण्यासाठी आले आहेत. चैत्यभूमीवर या दिवशी माथा टेकवणं म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या जीवनमुल्यांचा जागर करणं असे होय. बाबासाहेबांनी दिलेल्या सशक्त आणि सक्षम अशा संविधानाच्या आधारावर आपल्या देशाच्या लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या विद्यवत्तेच्या जोरावर आपल्या देशाला कायदे तर दिलेच पण त्यांनी अर्थ, उद्योग, महिला, शिक्षण या सगळ्या धोरणांची त्यांनी आखणी करून दिली. या सगळ्या धोरणांना त्यांनी मानवतेची जोड दिली हे विशेष. यामुळेच भारतात एकता, बंधुता आणि त्यातून एकात्मता या तत्वाना बळ मिळालं. बाबासाहेबांच्या द प्रॉब्लम ऑफ रुपी या ग्रंथालासुद्धा यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ग्रंथात त्यांनी भारतीय चलनाच्या उदयाची चिकित्सा केली आहे. तसेच भारताची आदर्श चलन पद्धती कोणती याचा देखील उहापोह त्यात त्यांनी केली. 26 नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन साजरा केला. आजच्या नवीन पिढीला संविधानाचे महत्व समजावे हा त्यामागील उद्देश होता. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला. ही देखील आपल्यासाठी ऐतिहासिक घटना आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश चंद्रचूड यांनी यावेळी समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
बाबासाहेबांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर हा तळागळातील उपेक्षित घटकाना न्याय देण्यासाठी केला. डॉ. बाबासाहेबांचे विचार जागरूक ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपलं सरकार हे सर्वसामान्याचं सरकार आहे. सरकारने बाबासाहेबांच्या चरित्र साधने समितीच्या कामाला वेग दिला आहे. बाबासाहेबांनी यांचे चरित्र पाहले तर त्यांनी वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात नैतिकतेला खूप महत्व दिलं आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या घटना समितीच्या पहिल्याच भाषणात त्यांनी सत्ता ही समाज परिवर्तनाचे हत्यार असल्याचे सांगितले होते, त्याच विचारावर आपले सरकार चालते. सत्तेचा वापर हा परिवर्तनासाठी, लोकांच्या भल्यासाठी, सर्वांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्यासाठी आपण काम करत आहोत. व्यक्तीगत प्रतिष्ठा जपण्याएवजी आपण संविधानातील मूल्यांची प्रतिष्ठा जपली पाहीजे. संविधान मूल्य जपणं आणि त्यासाठी कृतीशील कार्यक्रमाची आणखी केल्यावरच ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. असेसुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.