तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव :

डोंबिवली – तिरुपती बालाजी देवस्थान देशातील लाखो भक्तांच्या मनातील अढळ असे श्रद्धास्थान आहे. मात्र सर्व भाविकांना तिरुपती येथे जाऊन श्री बालाजी यांचे दर्शन घेणे अनेकदा शक्य नसते. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, २५ फेब्रुवारी रोजी डोंबिवली येथील प्रिमीयर कंपनी मैदानात हा मंगल सोहळा संपन्न होणार असून त्यापूर्वी शहरात महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

श्री तिरूपती देवस्थान येथील श्री भगवान बालाजींचे संपूर्ण देशभरात मोठ्या संख्येने भक्तगण आहेत. यातील अनेक भक्तांना तिरुमला तिरुपती येथे जाऊन दर्शन घेणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून मंदिर व्यवस्थापना च्या वतीने विविध ठिकाणी श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यापूर्वी २०१८ मध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात भव्य स्वरूपात श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शोभायात्रेमध्ये विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले होते. या शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे, उत्तर भारतीय समाज, दक्षिणेतील सर्व समाजातील बांधव सहभागी झाले होते. याच पद्धतीने यंदाही कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे डोंबिवली येथे हा भव्य दिव्य असा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे. रविवार, २५ फेब्रुवारी राजी सकाळपासून हा महोत्सव रंगेल.

तिरुपती येथील पूजेतील मूर्ती आणली जाणार

रविवार, २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला हा श्रीनिवास कल्याणम् महोत्सव त्याच्या आयोजनासह सर्वार्थाने विशेष ठरणार आहे. या महोत्सवासाठी आणली जाणारी श्री बालाजी यांची मूर्ती ही तिरुमला देवस्थान येथील नित्य पूजेतील मूर्ती असणार आहे. त्यासोबतच तिथल्या कार्यक्रमात वापरला जाणारा श्री बालाजी भगवान यांचा रथही डोंबिवलीत आणला जाणार आहे. त्यासोबतच तिरुपती येथील प्रमुख आचार्य, तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष हेही  या मंगल महोत्सवाच्या निमित्ताने डोंबिवलीत दाखल होणार असल्याची माहिती आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी, दक्षिण भारतीय तामिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू, आदी समाजाच्या प्रमूख प्रतिनिधींसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.

असा असणार महोत्सव ..

रविवार, २५ फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेच्या गोग्रासवाडी येथील श्री बालाजी मंदिरापासून ते प्रीमियर कंपनी मैदानापर्यंत श्री बालाजी यांची रथातून वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर प्रीमियर कंपनी मैदानावर या श्रीनिवास मंगल महोत्सवाचा मुख्य सोहळा संपन्न होईल. त्याठिकाणी विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० वाजता विविध मंत्रोच्चारात आरती, सकाळी ७.१५ वाजता तोमाला सेवा, सकाळी ८ वाजता पूजा, सकाळी ९ ते ११.३० वाजता अभिषेकम, दुपारी ३ ते ५ भव्य शोभायात्रा आणि सायंकाळी ६ ते ९ वाजता कल्याणम उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचा एकंदर आवाका आणि भव्यता पाहता त्यासाठी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून सुमारे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

डोंबिवलीत साक्षात भगवान बालाजी अवतरणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या उत्सवाच्या निमित्ताने साक्षात बालाजी भगवान अवतरणार आहेत. तसेच हा सोहळा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी व्हायला हवे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

——-

– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *