ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे १२ हजार हेक्टर क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न
ठाणे, दि.१९ : ठाणे जिल्हयात रब्बी हंगामात दुबार पिके घेण्यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित हरभरा बियाणे वाटप सप्ताह दि. २४ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. भात पड क्षेत्रात हरभरा पिकाची प्रात्यक्षिके ७४५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत आहेत. त्यासाठी ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.
जिल्हयात खरीप हंगामात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचा समावेश होतो. उर्वरित क्षेत्रावर नाचणी, वरी, कडधान्ये व बांधावर तुर घेतली जाते. जिल्हयात रब्बी हंगामात पाहिजे त्या प्रमाणात पिके घेतली जात नाहीत. या हंगामातही दुबार पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले.
जिल्ह्यातील भेंडी निर्यातीसाठी प्रयत्न
यावर्षी रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य पिकाबरोबरच भाजीपाला क्षेत्र वाढीसाठीही विस्तार करण्यात येत आहे. निर्यातक्षम भाजीपाला उत्पादनासाठी भेंडी लागवड शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येत आहे. भेंडीची निर्यात करणे सोयीस्कर व्हावे यासाठी भेंडी उत्पादक शेतकऱ्यांची व्हेजनेट प्रणालीव्दारे नोंदणी केली जात आहे.
जिल्ह्यात रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला लागवड व तृणधान्या मध्ये मका पिकाची क्षेत्र विस्तारात समावेश करुन एकुण क्षेत्र १२ हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. दि. १८ ऑक्टोबर २०२१ पासून जिल्हा कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह साजरा केला जात आहे. त्यामाध्यमातून हरभरा क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. माने यांनी सांगितले. कडधान्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रात्यक्षिक घेण्यात येत असून खरीप हंगामात बांधावर तुर लागवडीचा कार्यक्रमाचे २९२ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आलेली असून ६२.५४ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे.
भात पड क्षेत्रात (भाताच्या काढणीनंतर मोकळे असलेले शेत) कडधान्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दुबार पिकाची लागवड करण्यासाठी हरभरा पिकाची प्रात्यक्षिके ७४५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत आहेत. त्यासाठी ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुका स्तरावर करण्यात आलेला आहे. भात पड क्षेत्रावर गळितधान्य पिकाची लागवडीसाठी जिल्हयात १६२ हेक्टर क्षेत्रावर भुईमुग पिकाची प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून ९७ क्विंटल भुईमुग बियाणे वाटप करण्यात येणार आहे, असेही माने यांनी सांगितले.
भात पिकाच्या काढणीनंतर उर्वरित अंश ओलीवर कडधान्य पिकाची लागवड करणेसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. त्याबरोबरच गत वर्षी हरभरा बियाणे वाटप केलेल्या शेतकऱ्यांना क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.