मुंबई :  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडी कुठे तरी मागे पडलेली दिसत आहे यावरून   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ”ज्यांनी फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोप इतक्यावरच वर्ष घालवलं आणि एकही दिवस असा सोडला नाही, जेव्हा त्यांनी टीका टिपणी आणि टोमणे मारले नसतील. हे लोकांनी नाकारले आहे. त्यांना लोकांनी घरी बसवलं आहे, असंही त्यांना घरी बसायची सवय होतीच”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.  या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरताना दिसत आहे. तर दुसऱ्या क्रमवार अजित पवार गट आणि तिसऱ्या क्रमांकावर शिंदे गट असल्याचं निकालावरून दिसत आहे. यावरूनच मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ”ग्रामपंचायतमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल मिळाला आहे. मी मतदारांचा धन्यवाद करतो. महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प आम्ही चालना देण्याचे काम केलं. सर्वांना न्याय देण्याचा काम आमच्या सरकारने केलं. शासन आपल्या दारी खरोखर लोकांपर्यंत पोहोचलं आहे. आमचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले म्हणून हा निकाल आपण पाहतोय.”  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”सर्व समाजाने पाठबळ दिला आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झालं. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये महायुतीचा असाच विजय होत राहील. ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही देऊ आणि मोदींचे हात अजून बळकट करू असेही शिंदे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १६१७  ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजपला सर्वाधिक ६९७, अजित पवार गटाला ३३० आणि शिंदे गटाने २३५  जागांवर विजय मिळवला आहे. तर शरद पवार गटाने १४२, काँग्रेसने १३७  आणि ठाकरे गटाला फक्त ९४  ग्रामपंचायतीवर समाधान मानावं लागलं आहे. यावरूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!