मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.

राज्यातील 113 नगरपंचायतींसाठी 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या


राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 88, डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 आणि 7 नवनिर्मित अशा एकूण 113 नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!