राज्यात स्टार्ट-अप हब तयार करणे आवश्यक -राज्यपाल विद्यासागर राव
मुंबई : ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत स्टार्टअप हब तयार केल्यामुळे राज्यातील संशोधन, तसेच नवीन उपक्रमांना चालना मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज केले. दुर्गादेवी सराफ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् या संस्थेचा पदवी दीक्षांत समारंभ राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत आज मालाड येथे पार पडला. यावेळी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरूडॉ.सुहास पेडणेकर, राजस्थानी संमेलन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक सराफ, राजस्थानी संमेलन शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. कैलाशजी केजरीवाल, महासंचालक डॉ.एन.एम. कोंडप, संचालक डॉ. सी बाबू, ट्रस्टचे सभासद,कर्मचारी आणि पदवीधर विध्यार्थी व पालक उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, राज्यस्थानी संमेलन शिक्षण ट्रस्टने यावर्षी आपल्या प्रतिष्ठित सेवेची 70 वर्षे पूर्ण केली आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेल्या सात दशका दरम्यान, ट्रस्टने शिक्षणाचा प्रसार आणि एक सुविचारीत समाज तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थेने प्राथमिक शिक्षणापासून ते पदवीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण, उच्च शिक्षण संस्था, वाणिज्य, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान व माध्यम अभ्यास आदी क्षेत्रात आपले महत्वपुर्ण योगदान दिले आहे. आपल्या शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त राज्यस्थानी संमेलन ट्रस्टने समाजाच्या सामाजिक व मानवतावादी गरजा पूर्ण केल्या आहेत त्या खरोखर उल्लेखनीय आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.