मुंबई : कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेवून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येवून गर्दी करू नये. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. दिपावलीत फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदुषण लक्षात घेवून फटाके फोडण्याचे टाळावे. अशा विविध मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहेत.
कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असली तरी दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल याची दक्षता घ्यावी. दिपावली उत्सवानिमित्त कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तू खरेदी करणसाठी दुकानात व रस्तयांवर गर्दी होत असते. तथापि नागरिकांनी शक्यतो गर्दी टाळावी, विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांनी घराबाहेर पडणे टाळावे तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.
दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून नागरिकांच्या व प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरित परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीनंतर दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे ही विचारात घेवून नागरिकांनी यंदा फटाके फोडण्याचे टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
शासनाच्या ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मो्ठया प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे दिवाळी पहाट व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे कोटेकर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी.