नवी दिल्ली, 01 जानेवारी : लॉरेन्स बिश्नोई टोळीचा खास गुंड गोल्डी बरार याला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. कॅनडामध्ये राहणारा गोल्डी पंजाबमध्ये खून, खंडणी आणि शस्त्रास्त्र तस्करीत सहभागी आहे. सिद्धू मूसेवाला खून प्रकरणासह अनेक घटनांमध्ये तपासयंत्रणा गोल्डीचा शोध घेत आहेत.
गँगस्टर गोल्डी बरार याला केंद्रीय गृहमंत्रालयाने आज, सोमवारी दहशतवादी घोषित केले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा यांनाही दहशतवादी घोषित केले आहे. हे दोघेही कॅनडामध्ये लपून बसले आहेत. पंजाबमधील खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतही त्यांचा सहभाग आहे. गोल्डी बरार हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास सहकारी आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर गोल्डी बरारने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा आरोप असलेला बरार कॅनडामध्ये लपला आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी गोल्डीच्या घरावर छापा टाकला होता. तसेच एनआयएने देखील गोल्डी बरारशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत.