डोंबिवली:  आपले स्वतःचे घर नाही तर कमीत कमी एखादी छोटीशी सदनिका आपल्या हक्काची असावी, अशी इच्छा उराशी बाळगणाऱ्या मध्यमवर्गीयांनी सन १९७१ साली एकत्र येऊन श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित स्थापन केली. आज त्या गृहनिर्माण संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय.यानिमित्ताने येत्या दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, नगरसेविका  खुशबू चौधरी, माजी आमदार जगन्नाथराव पाटील, निर्माते रवी जाधव, मेघना जाधव, गीतकार संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी, महापालिका, पोलीस प्रशासनातील अधिकारी,  सहकारी संस्था रजिस्टार, विविध बँकांचे पदाधिकारी/ डायरेक्टर्स, सिनेदिग्दर्शक आणि  संस्था उभारणीत महत्त्वाचा वाटा योगदान देणारे  नाखे कुटुंबिय व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डोंबिवली पूर्वेतील सारस्वत कॉलनी येथे श्री विवेकानंद गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेची अधिकृत नोंदणी १९ सप्टेंबर १९७१ रोजी करण्यात आली. या संकुलात आज १७ इमारतींमध्ये ४०४ सभासद स्वतःच्या नावावर असलेल्या सदनिकेत गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांची घट्ट एकी पाहून खरोखरीच थक्क व्हावयास होते. अशी ही आदर्शवत सोसायटी आपल्या संस्था स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून त्यांत बाल, तरुण – तरुणी, वृद्ध, असे सर्वजण आनंदाने सहभागी होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांत धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांत सभासदांना सहकार कायदा व त्या अनुषंगाने येणारे विषय व त्यात सभासदांची स्वतःची सोसायटी प्रति असलेली जबाबदारी याबद्दल विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे. तसेच संस्थेतील ७५ वर्षीय वरिष्ठ मंडळीचा व संस्था उभारणीत ज्यांनी ज्यांनी विशेष योगदान दिले आहे, त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने, अशा शंभरहुन अधिक व्यक्तींचा खास सन्मान केला जाणार आहे. सोसायटीच्या हक्काच्या प्रांगणात कार्यक्रम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!