कोकणवासीयांचा प्रवास खड्ड्यातूनच ! गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीनेच
नागोठणे : (महेंद्र म्हात्रे) – पळस्पे ते इंदापूर या ८४ कि.मी. दरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सहा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. आणि नजीकच्या काळात हे काम पूर्ण कधी होईल याची शाश्वती नसल्याने पूर्वीचाच महामार्ग चांगला होता असे नागरिकांसह प्रवासी बोलत आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीस खुला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ३ मार्चला नागोठण्यात व्यक्त केला होता. पण सध्याच्या सुरू असलेल्या धीम्या गतीच्या कारभारामुळे गडकरींचा विश्वास खरे चाललेले काम पाहता ही २०१८ ची तारीख नक्की उजाडणार का ! असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जातोय.
मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ कि. मी. मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची सन २०११ साली अधिसूचना निघून सन २०१२ पासून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात सुद्धा करण्यात आली. या कामासाठी पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे दोन टप्पे करण्यात येऊन ते महावीर इन्फ्रास्ट्रक्शर आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्शर या दोन कंपन्यांना बीओटी तत्वावर वर्ग करण्यात आले.नव्याने तयार करण्यात आलेल्या या मार्गावर लहान – मोठे पूल, भुयारी मार्ग तसेच उड्डाण पूल होणार असून त्यातील काही कामे अनेक वर्षे चालू झाली असली, तरी ती पूर्णत्वास नेण्यास ठेकेदार यशस्वी झालेले नाहीत. हा सुधारीत महामार्ग २०१४ -१५ पर्यंत पूर्ण होईल असे अपेक्षित असतांना २०१७ साल पूर्ण व्हायची वेळ आली असली, तरी चाळीस – पन्नास टक्के काम बाकी असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या काही कारणास्तव महावीर इन्फ्रास्ट्रक्शर या कंपनीने सोडले असल्याने या जागी आता दुसरा ठेकेदार नेमण्यात आला आहे.
या कामात पळस्पे ते कर्नाळा खिंड, हमरापूर फाटा ते पेण – वडखळ, कासू – नागोठणे ते सुकेळी खिंड या मार्गात प्रचंड असे खड्डे तसेच धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने पनवेल ते नागोठणे या दीड तासाच्या प्रवासाला तीन ते चार खर्ची पडत आहेत. या बाबत सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्शर या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक गजाजन आवारे यांना विचारले असता,या भागात पावसाळा मोठ्या प्रमाणात असल्याने काम बंद ठेवण्यात आले होते व आठवडाभरात कामाला वेगाने सुरुवात केली जाईल. आतापर्यंत आमच्या हद्दीतील पंचावन्न ते साठ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या या कामासाठी पुण्यातील एका सहठेकेदाराची नेमणूक केली असून कामाला आणखी वेग येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पळस येथील रोहे पंचायत समितीचे माजी सभापती शिवराम शिंदे म्हणण्यानुसार शासनाने या ठेकेदारांना बळ द्यावे असे ते सांगतात. पळस ते वाकण या ७ कि.मी. च्या मार्गात अनेक खड्डे पडले असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी होत आहेत. रस्ता पूर्ण होईल तेव्हा होईल ! सुप्रीम कंपनीने या खड्ड्यांवर मलमपट्टी तरी तातडीने करावी अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
गडकरी काय म्हणाले …
मुंबई – गोवा महामार्गाच्या पनवेल – इंदापूर या ८४ कि. मी. मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँग्रेसच्या राजवटीत चालू झाले होते व तेव्हापासूनच ते रखडलेले आहे. सध्या कामाने पुन्हा वेग घेतला असून ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. महिनाभरात हे काम ५० टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर बँकांच्या माध्यमातून सरकारकडून या कामासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले असून डिसेंबर २०१८ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीस खुला झाला असेल असे सांगितले आहे मात्र कामाची संथ गती पाहून हे काम एक वर्षात पूर्ण होईल का असाच प्रश्न काेकणवासियांना पडला आहे. पावसाळ्यामुळे बंद ठेवलेले काम आठवडाभरात चालू होऊन कामाला गतीने सुरुवात होईल असे सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प अधिकारी गजानन आवारे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया : रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था कोकणातील लोकांची झाली असून रोज होणाऱ्या अपघाता मुळे महामार्ग शेजारी राहणे म्हणजे जीव मुठीत घेऊन राहणे झाले आहे.सरकारचे मंत्री येतात दरवर्षी मोठं मोठ्या बढाया मारतात आणि निघून जातात मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल तेव्हा होईल,सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने या खड्ड्यांवर मलमपट्टी तरी तातडीने करावी. (शिवराम शिंदे, रोहे पं. स. चे माजी सभापती )