पालिकेकडून नळजोडण्या खंडीत रहिवाशांचा उपोषणाचा इशारा 

मुंबई : घाटकोपर (प) येथील गोविंद नगरमध्ये राहणाऱ्या सुमारे 30 हून अधिक रहिवाशांच्या नलजोडण्या कुर्ला एल वॉर्ड प्रशासनाने कोणतीही नोटीस न देता तोडल्या आहेत. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पालिका प्रशासनाच्या या कारवाईची तक्रार येथील रहिवासी विनोद सोनकांबळे यांनी घाटकोपर पोलिस ठाणे आणि मुंबई पालिका आयुक्त अजोय महेता यांच्याकडे केली आहे. पालिकेने खंडित केलेली नळजोडणी लवकरात लवकर सुरु न केल्यास ग्राहक संरक्षण न्यायालयात तसेच एल वॉर्डमध्ये बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
घाटकोपर (प) येथील असल्फा हिमालय सोसायटीजवळ वाल्मिक नगरात गोविंद नगरमध्ये राहणाऱ्या 25 ते 30 रहिवाशांच्या नलजोडण्या पालिका प्रशासनाने तोडल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कुर्ला एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना आणि नोटीस न देता ही कारवाई केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांच्या दबवामुळेच ही कारवाई केल्याचा आरोप रहिवासी विनोद सोनकांबळे यांनी केला आहे. 12 जूनला पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईत काही रहिवाशांना तात्काळ नलजोडणी देऊन त्यांची पूर्वीचीही नळजोडणी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र आमची जुनी नळजोडणी असताना आणि पालिकेचे पाणी बिल वेळेत भरत असतानाही आकसापोटी ही कारवाई केल्याचा आरोप सोनकांबळे यांनी केला. नळजोडणी तोडल्यानंतर येथील रहिवाशांनी कुर्ला एल वॉर्डच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी नळजोडणी पूर्ववत करण्यास नकार दिला. त्यामुळे विकतचे पाणी पिण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. पालिकेने खंडित केलेली नळजोडणी लवकरात लवकर सुरु न केल्यास आम्ही एल वॉर्डमध्ये बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही येथील रहिवाशांनी दिला आहे.

**

आम्ही इथल्या हिवाशांना बुस्टिंग पाइपलाईनद्वारे नळजोडण्या दिल्या होत्या. त्यामुळे या नलजोडण्या तोडून आम्ही इतर ठिकाणी दिल्या आहेत. तसेच बुस्टिंग पाइपलाइनद्वारे नळजोडणी देता येत नाही.  (- राजन प्रभू, जलअभियंता, एल वॉर्ड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *