घाटकोपर रेल्वे स्टेशन मनसेच्या टार्गेटवर
राज ठाकरेंच्या डेडलाईनला २ दिवस शिल्लक
घाटकोपर ( निलेश मोरे ) : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात भव्य संताप मोर्चा काढून रेल्वे पुलावरील फेरीवाले १५ दिवसात हटवा अन्यथा खळखटयाक करण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या डेडलाईनला अवघे 2 दिवस उरले आहेत. मात्र अजूनही घोटकोपर रेल्वे पुलावरील फेरीवाले हटिवण्यात आले नाही. त्यामुळे बुधवारी मनसेच्या पदाधिका-यांनी रेल्वेचे डेप्युटी अधिकारी सावरीया व जेना यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. देान दिवसात घाटकेापर रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त करावा अशी मागणी करीत आंदोलनाची आठवण करून दिली.

राज ठाकरेंच्या संताप मोर्चानंतर रेल्वे प्रशासन व पालिका प्रशासन कामाला लागले. काही महत्वाच्या गर्दीच्या रेल्वे स्टेशनवरील फेरीवाले हटवण्यास पालिका आणि रेल्वे पोलिसांना यश आले असले तरी काही रेल्वे स्टेशनला फेरीवाल्यांचा गराडा आहे. घाटकोपर रेल्वे स्थानक हे त्यापैकीच एक आहे. मुंबई उपनगरातील घाटकोपर हे महत्वाचे जंक्शन असून घाटकोपर ते वर्सोवा या पहिल्या टप्प्यातील मेट्रोमुळे या स्थानकावर प्रवाशांची दर दोन मिनिटाला पुलावरून लाखो प्रवाशांची गर्दी होते . या स्थानकावरील पूल जरी रुंद असले तरी स्टेशन परिसर फेरीवाल्यांनी व्यापल्याने प्रवाशांना गर्दीतून कसा बसा मार्ग काढावा लागत आहे. स्टेशन परिसरात पूर्व आणि पश्चिमत शेअर रिक्षा चालक आणि फेरीवाल्यानी गराडा घातलेला आहे . 14 वर्षांपूर्वी बस क्रमांक 416 मध्ये अतिरेक्यांनी बॉम्ब स्फोट घडवल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे स्थानक अतिमह्त्वाचे ठरते. प्रवाशांच्या सुरक्षेखातर दोन दिवसांत स्टेशन परिसर फेरीवाल्यापासून मोकळा करण्यात आला नाही तर मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील व परिसर मोकळा करतील असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आलाय.

प्रवाशांच्या प्रतिक्रिया

रस्ता अडवून फेरीवाले बसत असल्याने प्रवाशांना चालायला मार्ग नसतो. पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडे ही परिस्थिती आहे. . वाहतूकीला अडथळा तर होतोच मात्र प्रवाशांना व सामान्य नागरिकांना वाट काढणे देखील अवघड होते. पालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई केली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने स्टेशनचा महत्वाचा आर जे कॉलेज ते हिंदूसभा हॉस्पिटल अंतरा पर्यंत असलेला परिसर फेरीवाल्या पासून मोकळा केलाच पाहिजे अन्यथा भविष्यात मोठी घटना घडू शकते . ( संदीप तावडे – प्रवासी )

स्टेशन परिसरात फेरीवाल्यांबरोबच शेअर रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे देखील प्रवाशांना खूपच त्रास होतो. पालिका व वाहतूक पोलसांचेही भय यांना राहिलेले नाही. एल्फिन्स्टन सारखी घटना घडली तरच कारवाई होते त्यानंतर परिस्थिती जैसे थेच दिसून येते . ( सचिन गेले, प्रवासी )

One thought on “घाटकोपर रेल्वे स्टेशन मनसेच्या टार्गेटवर : राज ठाकरेंच्या डेडलाईनला २ दिवस शिल्लक”
  1. Due to shares auto and hawkers people are unable to walk also. The hawkers people treat that they are the owner of the that road pls do some favour on us

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *