गोळीबारच्या रस्ता दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला
घाटकोपर ( निलेश मोरे ) गेली पाच वर्ष खड्डे , खडी आणि वाहतुकीला अरुंद असा अडसर ठरलेला घाटकोपरचा गोळीबार रस्ता अखेर दुरुस्तीच्या मार्गावर असून मंगळवार 3 ऑक्टोबर पासून या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाला सुरुवात होणार आहे , शिवसेना प्रभाग समिती अध्यक्ष , प्रभाग 127 चे नगरसेवक सुरेश पाटील आणि भाजपा प्रभाग क्र 130 च्या नगरसेविका बिंदू त्रिवेदी यांनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो या गोळीबार रोड मार्गावरून गेली असता मेट्रो पिलरसाठी या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले होते . मेट्रोच्या विकसित बांधकामानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद तर झालाच मात्र रस्त्याची पूर्णपणे वाताहत देखील झाली . गेली पाच वर्ष या रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे , वाहतूक कोंडी अशी परिस्थिती उदभवत आहे . पत्रकार , सामाजिक संस्था , विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिकांनी वेळोवेळी या रस्त्याच्या डागडुजीसाठी पालिकेकडे मागणी केली मात्र पाच वर्ष या रस्त्यावर केवळ डाबरीकरणाची मलमपट्टी होत राहिली .वासुदेव बळवंत फडके मार्ग अर्थात गोळीबार रोड हा 210 मीटर अंतर असलेल्या रस्त्याच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने 1 करोड 80 लाख इतका खर्च मजूर केला आहे . मंगळवार पासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करून सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले .