डोंबिवलीची टीम आयोध्देला रवाना : हिंदीतून गीतरामायण सादर करण्याचा मिळाला प्रथमच मान
डोंबिवली : श्री रामदास मिशन युनिवर्सल सोसायटी यांच्यावतीने १३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१८ दरम्यान राम राज्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलय. यानिमित्ताने अयोध्देत ग.दी.माडगुळकर रचित गीतरामायण प्रथमच हिंदीतून सादर करण्याचा मान डोंबिवलीतील सुप्रसिद्ध गायक, संगीतरत्न हभप अनंतबुवा भोईर यांना मिळालाय. त्यासाठी डोंबिवलीची १७ कलाकारांची टीम गुरूवारी रात्री ११ वाजता कल्याण येथूनअयोध्देकडे रवाना झाली. यावेळी अनंतबुवा आणि त्यांच्या सहकारी कलाकारांच्या गळयात रामनामी दुपट्टा आणि पुष्पमाला घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रसिध्द उद्योगपती अशोक म्हा़त्रे, हिंदी भाषा जनता परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ दुबे, प्रभाकर चौधरी, प्रिति चौधरी, राम पाटील, आणि त्यांचा चाहतावर्ग उपस्थित होता. ११ व १२ फेब्रवारीला श्री अयोध्दा येथील कारसेवक पुरम येथे हभप अनंत बुवा हिंदीतून गीतरामायण सादर करणार आहेत.
तीन वर्षापूर्वीच बुवांनी अयोध्देत प्रथमच मराठीतून सुमारे पाचशे लोकांसह गीतरामायण सादर केले होते. मात्र राममंदिरचे अध्यक्ष जन्मेजय महंत शरणजी यांनी हिंदीतून गीतरामायण सादर करण्याची सुचना केली होती. त्या सुचनेनुसारच अयोध्देत हिंदीत गीत रामायण सादर होणार आहे. पंडीत रूद्रदत्त मिश्र व ज्येष्ठ हिंदी कवी अलोक भट्टाचार्य यांनी गीत रामायण हिंदीत भाषांतर केलंय. २००५ पासूनच बुवांनी गीतरामायणाला सुरूवात केली. गीत रामायणात एकूण ५६ गीत आहेत. गीत रामायणात लाईव्ह नृत्य हेच मुख्य वैशिष्ट आहे. विशेष म्हणजे नृत्य कोरिओग्राफर हे केरळचे, निवेदक बंगालचे, गायक मंडळी महाराष्ट्रातील आणि अनुदवादक उत्तरप्रदेशचे असा संगम गीत रामायणात साधला जाणार आहे . अशी माहिती हभप अंनतबुवा भोईर यांनी सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना दिली. हिंदीतून गीत रामायण पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलय. यावेळी माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, विश्वनाथ दुबे, अशोक म्हात्रे, प्रभाकर चौधरी उपस्थित होते. दहा हजार पुस्तक विनामूल्य वाटण्यात येणार आहेत असे बुवांनी सांगितले.