डोंबिवली/ प्रतिनिधी : एकिकडे कोरोनाच्या महामारीने नागरिक त्रस्त असतानाच, दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून डोंबिवली शिवमंदिर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी बंद असल्याने कोरोना रूग्णांची मृत्यनंतरही फरफट होत आहे. तसेच इतर मृतदेहांनाही लाकडावरच अंत्यंसंस्कार पार पाडावे लागत आहे. गोरगरीबांना त्याचाही नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. डोंबिवलीत मरणयातना संपता संपेना अशी परिस्थिती आहे. मात्र या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक कुठे गेले ? असा सवाल आता डोंबिवलीकर उपस्थित करीत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी वांरवार नादुरूस्त होऊन बंद पडत आहे. त्यामुळे अंत्यंसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांची खूपच धावपळ होत आहे. कोरोना रूग्णाचे मृत्यूनंतर गॅस शवदाहिनीतच अंत्यसंस्कार केले जाते. शिवमंदिर स्मशानभूमीतील गॅस शववाहिनी बंद असल्याने, तो मृतदेह पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत अंत्यंसंस्कारासाठी नेला जातेा. काही दिवसांपूर्वीच शिवमंदिर आणि पाथर्ली या दोन्ही स्मशानभूतील गॅस शवदाहिनी बंद असल्याने ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी डोंबिवलीहून कल्याणला न्यावा लागला होता. त्यामुळे डोंबिवलीत मरणानंतरही मृतदेहाची फरपट सहन करावी लागत आहे. मात्र याकडं कुणाचेही लक्ष नाही. स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींनी डोंबिवलीकरांना जणूकाय वा-यावर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींविषयी डोंबिवलीकरांमध्ये नाराजीचा सूर आहे, त्यामुळे डोंबिवलीकरांची ही फरफट कधी थांबेल असाच प्रश्न उपस्थित होत आहे. .
मागील आठवड्यातच गॅस शवदाहीनी दुरुस्त करून घेतली होती, मात्र वारंवार बंद पडत असल्याने तिथल्या कर्मचाऱ्यांनाच नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. शिवमंदिर स्मशानभूमीत दररोज ५ ते ६ कोरोनाचे मृतदेह येतात, त्याशिवाय इतरही वेगळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. त्यामुळे मृतदेहाबरोबर नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
——–