डोंबिवलीत गॅस मेकॅनिकच्या लुटमारीचा पर्दाफाश, ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी : मनसे विद्यार्थी सेनेने भरला गॅस एजन्सीला दम
डोंबिवली : मेकॅनिककडून गॅस शेगडीमध्ये बिघाड असल्याचे चुकीचे रिपोर्ट देऊन ग्राहकांना भयभित करून पैसे उकळण्याचे सर्रास प्रकार डोंबिवलीत घडत असून याचा पर्दाफाश झाल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तुकारामनगरमधील शिवशक्ती भारत गॅस एजन्सीवर धडक देत चांगलाच दम भरला. यापुढं ग्राहकांकडून तक्रारी आल्यास गॅस एजन्सीला टाळं ठोकू असा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेथे यांनी दिला.
गॅस एजन्सीकडून येणारे मेकॅनिक ग्राहकांकडे शेगडी तपासणी करायला गेल्यानंतर त्या शेगडीमध्ये काही ना काही बिघाड असल्याचे सांगून नवीन शेगडी घेण्यासाठी भाग पाडत आहेत. तसेच त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या अनेक तक्रारी मनसे विद्यार्थी सेनेकडे आल्या आहेत. एका ग्राहकाकडून आलेल्या तक्रारीत तीन महिन्यांपूर्वी घेतलेली शेगडी लिक असल्याचा रिपोर्ट गॅस मेकॅनिकने दिला होता. मात्र कंपनीच्या मॅकेनिकने पेटत्या मेणबत्तीने शेगडीची तपासणी करून शेगडी लिक नसल्याचे दाखवून दिले. याचा व्हिडीओही ग्राहकाने तयार केलाय. हे सगळे पुरावे घेऊन विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेथे यांनी कार्यकत्यांसह गॅस एजन्सीवर धडक देऊन त्यांना जाब विचारला. यापुढे शेगडीचे चुकीचे रिपोर्ट देऊन ग्राहकांना भयभित करून, पैसे उकळल्याचा प्रकार घडल्यास मनसे स्टाईल कारवाई करू असा दम जेथे यांनी भरला. तसेच गॅस एजन्सीमधील सर्व कर्मचारी हे हिंदीत बोलतात. ग्राहक मराठीत बोललेले त्यांना समजत नाही. त्यामुळे गॅस एजन्सीतील कर्मचा-यांना मराठीत बोलायला सांगा असाही इशारा त्यांनी दिला. कोणताही गॅस एजन्सीचा कर्मचारी विनाकारण पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्यास ग्राहकांनी मनसेशी संपर्क साधावा असे आवाहन जेथे यांनी केलय.
——