कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर फिल्मी स्टाईल गोळीबार, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

पुणे (अजय निक्ते): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर आज शुक्रवारी दुपारी कोथरूड जवळ सुतारदर्‍यात फिल्मी स्टाईल गोळीबार करण्यात आला. वर्मी लागलेल्या तीन गोळ्यांनी जखमी झालेल्या मोहोळचा मृत्यू झाला असून त्याच्यावर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न झाले आहे. शरद मोहोळसोबत असणार्‍यांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं असून त्यापैकी एकाच नाव समोर आलं आहे. आज मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता.

या गोळीबारामागे जमिनीचे वाद , आर्थिक मतभेद , की राजकीय वैमनस्य यापैकी काय कारण असू शकेल याबाबत संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी मोहोळ यांच्या पत्नीने भाजप चे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला होता. भाजप च्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.पत्नीच्या प्रवेशानंतर शरद मोहोळ देखील राजकारणात सक्रिय होतील का असा सूर पुण्यात उमटला होता. पण त्याआधीच आज त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर , ( सुतारदरा, कोथरूड) याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी शरद मोहोळवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनीच गोळीबार केल्यामुळे आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबाराचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मोहोळवर गोळीबार झाल्यानंतर त्याला उपचारासाठी सर्वप्रथम कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. नंतर त्याला ससून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मोहोळला मयत घोषित करण्यात आले. मोहोळ समर्थकांनी आणि नातेवाईकांनी ससून रूग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, गुन्हयात निष्पन्न झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *