गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
डोंबिवली : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार गुंड डोळा दात्या याला डोंबिवलीच्या दत्तनगरातून गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या गुंडाला कोयत्यासह जेरबंद करण्यात आले आहे. या गुंडाच्या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि रहिवाशांनी त्याच्या अटकेनंतर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दत्तनगर चौकातील प्रगती महाविद्यालय परिसरात राहणारा सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते (28) या पोलिस रेकॉर्डवरील नामचीन गुंडाला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तरीही हा गुंड शहरात दाखल झाल्याची माहिती हवा. दत्ताराम भोसले यांना मिळाली. हवा. भोसले यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. गुंड सागर उर्फ डोळा दाते हा शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दत्तनगर प्रगती कॉलेजच्या समोर गार्डन परिसरात हातात धारदार भला मोठा कोयता घेऊन भटकत होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष उगलमूगले, उपनि संजय माळी, हवा. दत्ताराम भोसले, विश्वास माने, बालाजी शिंदे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग या पथकाने गुंड डोळा दात्या याला जेरबंद केले. त्याच्याकडून प्राणघातक कोयता हस्तगत केला.
घातक शस्त्राने हल्ला करून परिसरात दहशत माजविण्याच्या 3 गुन्ह्यांसह एनडीपीएस कायद्यांतर्गत 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे डोंबिवली पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गुंडाला कल्याण-डोंबिवली परिमंडळ – 3 हद्दीतून 6 जून 2023 पासून 18 महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 142 प्रमाणे कारवाई करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वपोनि नरेश पवार यांनी सांगितले.
〰️